महिला पोलिसांची छेड काढणारे १५ जण अटकेत

रात्री-अपरात्री कामानिमित्त रस्त्यावरून जाण्याची गरज भासणाऱ्या महिलांची छेडछाड करणाऱ्या, त्यांच्या असहायत्तेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिकॉय मिशनतंर्गत आतापर्यंत लावण्यात आलेल्या ट्रॅपपैकी दहा वेळा यश मिळाले. यात पंधरापेक्षा अधिक संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


टवाळखोर, रोडरोमियोंना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी निर्भया पथक कार्यन्वित केले आहे. या पथकाद्वारे महिलांच्या सुरक्षिततेस प्राधन्य देण्यात येते. निर्भया पथकाच्या महिला अधिकारी व कर्मचारी थेट कारवाईसह जनजागृती सुद्धा करतात. घरातून पळून जाणाऱ्या, आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना या पथकाने सुखरूप परत आणले आहे. हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्यावेळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रात्रीच्या वेळी महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी डिकॉय ऑपरेशन सुरू केले. हे काम २३ डिसेंबरच्या रात्रीपासून सुरू झाले होते.